भारताने साखळी सामन्यात
पाकिस्तानविरुद्ध बॉल आऊटमध्ये विजय मिळवुन अंतिम ८ मध्ये प्रवेश मिळवला पण
त्यातील पहिल्याच सामन्यात न्युझिलंडविरुद्ध भारताला १० धावांनी पराभव स्विकारावा
लागला. १९१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गंभीर व सेहवागने ६ षटकांत ७६
धावांची सलामी देत धडाकेबाज सुरुवात करुन दिली परंतु त्यानंतर भारताची फलंदाजी
व्हिटोरीच्या गोलंदाजी समोर ढोपाळली शेवटी श्रीसंतने थोडा प्रतिकार केला पण त्याला
यश आले नाही. या सामन्यात झालेल्या पराभवाने उर्वरीत इंग्लंड व दक्षिण
आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विजय आवश्यक होता. न्युझिलंडविरुद्धच्या
सामन्याप्रमाणेच या सामन्यात गंभीर व सेहवागच्या जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजीचा
समाचार घेत १४.४ षटकांत १३६ धावांची सलामी भागीदारी करत मोठ्या धावसंख्येचा पाया
रचला. त्यानंतर १० धावांच्या आत दोघेही तंबुत परतले.१६.४ षटकांत भारताची ३ बाद १५५
अशी स्थिती झाली त्यानंतर मैदानावर आलेल्या युवराजने स्टुअर्ट ब्रॉडची पिसे काढली.
भारतीय डावाच्या १९ व्या षटकांत युवराजने स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर सहा
चेंडूत सहा षटकार खेचले आणि विक्रमी १२ चेंडुत अर्धशतक साजरे केले आणि भारताने १८
धावांनी विजय मिळवला.
भारत
व दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यापुर्वी न्युझिलंड व दक्षिण आफ्रिकेनी प्रत्येकी दोन
विजय मिळवले होते त्यामुळे उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी दक्षिण
आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताला विजय आवश्यक होता परंतु दुखापतीमुळे
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात धडाकेबाज खेळी करणारा युवराज सिंग या सामन्याला
मुकणार होता त्यामुळे सामन्यापुर्वीच भारतीय संघ अडचणीत आला होता. नाणेफेक जिंकुन
भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला पण पहिल्या ११ षटकांत हा निर्णय भारताच्याच अंगाशी
आला असे दिसत होता. १०.३ षटकांत भारताची अवस्था ४ बाद ६१ झाली होती त्यानंतर
नवोदित फलंदाज रोहित शर्मा व कर्णधार धोनीने भारताला १५० धावांचा टप्पा गाठुन दिला
व डावाच्या शेवटच्या चेंडूवर रोहितने षटकार ठोकुन पहिले अर्धशतक साजरे केले.
तसे
पाहता दक्षिण आफ्रिकेसारख्या तगड्या संघासमोर १५४ धावांचे आव्हान तसे कमीच होते
कारण विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनी २०६ धावांचे आव्हान ८ गडी व
१४ चेंडू राखुन लिलया पार केले होते. या सामन्यांत भारतीय गोलंदाजांचा कस लागणार
होता. आर पी सिंगने भारताला दमदार सुरुवात करुन देत दुसऱ्या षटकांत हर्षेल गिब्स व ग्रॅमी स्मिथला बाद
केले त्यातील ग्रॅमी स्मिथला बाद कारण्याचे श्रेय हे पुर्णपणे दिनेश कार्तिकचे
होते. स्लिपमध्ये उत्कृष्ट झेल घेऊन स्मिथला तंबुत पाठवले. त्यानंतरच्याच षटकांत
श्रीसंतने डिव्हिलीअर्सला पायचित केले. ६ व्या षटकांत रोहित शर्माच्या थेट फेकीवर
जस्टिन केम्पला बाद केले व त्यानंतरच्याच चेंडूवर आर पी सिंगने पोलॉकला त्रिफळाचीत
करुन दक्षिण आफ्रिकेची ५ बाद ३१ अशी अवस्था केली.
त्यानंतर
बाऊचर व मॉर्केलने प्रतिकार केला पण त्यांना यश आले नाही आणि भारताने ३७ धावांनी
विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली व त्यानंतर विजेतेपदाला गवसणी घातली. दक्षिण
आफ्रिकेला उपांत्य फेरीत धडकमारण्यासाठी विजय किंवा किमान १२६ धावा करणे आवश्यक
होते पण दोन्हीत त्यांना अपयश आले आणि ते स्पर्धेबाहेर गेले त्यांच्या जागी
न्यझिलंडचा संघ उपांत्य फेरीत दाखल झाला.
शंतनु कुलकर्णी
No comments:
Post a Comment