Sunday 2 October 2016

अजिंक्य रहाणे


      सध्याच्या भारतीय कसोटी संघातील एक भरवशाचा खेळाडु. युवा कसोटी संघाचा अविभाज्य घटक आणि उपकर्णधार. ज्याप्रकारे सुरुवातीच्या काळात संघात कमीत कमी ५-६ खेळाडु हे मुंबईचे असायचे ज्यात सुनील गावसकर, संदिप पाटील, रवी शास्त्री, अंशुमन गायकवाड, दिलीप वेंगसरकर, संजय मांजरेकर, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, वासिम जाफर आणि आता रोहित शर्मा व अजिंक्य रहाणे मुंबईच नाव पुढं नेत आहेत. मध्यंतरीच्या काळात फक्त सचिन तेंडुलकर मुंबईचा एकमेव खेळाडु भारताच प्रतिनिधित्व करत होता. सचिनच्या क्रिकेट कारकिर्दीच्या शेवटच्या सामन्यांमध्ये अजिंक्यला पदापर्णाची संधी मिळाली. अजिंक्यने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत पदार्पण केले तर इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय व टी-२० मध्ये पदापर्ण केले. अजिंक्यने सातत्याने देशांतर्गत स्पर्धांमध्ये खोऱ्याने धावा काढल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पाच हजारापेक्षा जास्त धावा काढत मुंबई संघाचा महत्त्वाचा खेळाडु बनला.

अजिंक्यच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा क्षण म्हणजे राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली राजस्थानसाठी आयपीएल मध्ये खेळण्याची संधी भेटली आणि सलग ३-४ वर्षे सलामीला येऊन द्रविडचा निर्णय सार्थ ठरविला आणि विश्वास जिंकला. राजस्थानसाठी केलेली कामगिरी ती फलंदाजीत असो वा क्षेत्ररक्षणात स्वत:ला पुर्णपणे झोकुन देऊन संघाला अनेक विजय मिळवुन दिले. २०१३ चा पदार्पणाचा सामना आणि त्यानंतर २०१५ ची आफ्रिकेविरुद्धची मालिका फक्त अजिंक्यने मायदेशात खेळल्या. या दोन वर्षांत त्याने दक्षिण आफ्रिका, न्युझिलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश आणि श्रीलंका या तगड्या संघांविरुद्ध त्यांच्याच देशात नेटाने फलंदाजी केली. जिथे पुजारा, विजय, धवन, रोहित यांच धावा काढण्यात सातत्य नसताना अजिंक्यने भारताला तारले आणि स्टेन, मॉर्केल,जॉनसन, स्टार्क यांना सडेतोड उत्तर दिले.
अजिंक्य रहाणेच्या छोट्याश्या कारकिर्दीमध्ये त्याने कसोटी सामन्यात न्युझिलंडविरुद्ध झळकावलेले पहिले शतक तसेच आफ्रिकेत केलेली ९६ धावांची खेळी सामना जिंकवण्यात जरी यशस्वी ठरली नसली तरी संघाच मनोधर्ये उंचवणारी नक्कीच होती आणि भारताला अजिंक्यच्या रुपाने मधल्या फळीतील फलंदाज गवसला जो परदेशी खेळपट्यांवर उत्तम प्रकारे खेळु शकतो. त्यानंतर एका मागे एक इंग्लंड दौरा, मायदेशातील एकदिवसीय मालिका आणि त्यानंतरचा मोठा ऑस्ट्रेलिया दौरा. इंग्लंड दौऱ्यात लॉर्डसवर झालेल्या कसोटी सामन्यात एक अविश्वसनिय खेळी करुन अजिंक्यने विजयात मोलाचा वाटा उचलला आणि भारताचे लॉर्डसवर कसोटी विजयाचे स्वप्न पुर्ण केले. त्याला साथ दिली ती इशांत शर्माने. ज्या ज्या वेळेस या विजयाची आठवण काढली जाईल त्या त्या वेळेस अजिंक्यच नाव "सामन्याचा हिरो" म्हणुन काढले जाईल. ज्या ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला आपल्या २४ वर्षांच्या कारकिर्दीतमध्ये अपयश आले तिथे अजिंक्यने आपल्या कसोटी कारकिर्दीतल्या सुरुवातीलाच लॉर्डसवर शतक झळकावले.
      भारतीय युवा संघाला परदेशीभुमीवर फक्त कसोटीसामन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अपयश आले पण एकदिवसीय सामन्यामध्ये युवा भारतीय संघ कोणत्याही संघाला सामोरा जाऊ शकतो हे २०१४ ची इंग्लंडमधील एकदिवसीय़ मालिका जिंकुन दाखवुन दिले. रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याने अजिंक्यला सलामीला यावे लागले आणि मिळालेल्या संधीचा त्याने पुरेपुर फायदा घेत पहिले शतक झळकावले आणि धवन सोबत मोठी भागिदारी करत भारताला मोठा विजय मिळवुन देत मालिकाही जिंकुन दिली. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत पुन्हा एकदा अजिंक्यची बॅट तळपली आणि पहिल्याच सामन्यात धवन सोबत पहिल्या गड्यासाठी २३१ धावांची भागिदारी करत दुसरे शतक झळकावले व भारताला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली.
      श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर भारताच्या युवा संघासाठी एक खडतर दौरा होता ऑस्ट्रेलियाचा ज्यात चार कसोटी सामने, तिरंगी मालिका आणि त्यानंतर होणारी २०१५ ची विश्वचषक स्पर्धा. पहिल्या दोन सामन्यात भारताचा पराभव झाला, तीसऱ्या सामन्यात अजिंक्यने कोहलीसोबत चौथ्या गड्यासाठी २६२ धावांची महत्त्वाची भागिदारी करत भारताला मोठी भावसंख्या उभारुन दिली आणि परदेशातील कामगिरी करण्याची मालिका सुरुच ठेवली परंतु त्याला तिरंगी मालिकेत अपयश आले. आपल्या कारकिर्दीतल्या पहिल्या वहिल्या विश्वचषकाच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अजिंक्यला अपयश आले पण याची भरपाई त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात तडाखेबाज अर्धशतकी खेळी खेळन भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात केली आणि विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. ऑस्ट्रेलियातल्या मोठ्या मैदानावर क्षेत्ररक्षणातही त्याने कोहली व जडेजाच्या साथीने अनेक धावा रोखण्यात मदत केली.
      विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाकडुन हार पत्कारल्यानंतर भारताला बांग्लादेशमध्ये एकदिवसीय मालिका खेळायची होती व या मालिकेत काही खेळाडुंना विश्रांती देऊन नवीन खेळाडुंना संधी मिळण्याची आशा होती पण विश्वचषकात सहभागी झालेला संघच कायम ठेवण्यात आला. कारण काही दिवसांपुर्वी त्यांनी पाकिस्तानचा ३-० ने धुव्वा उडवला होता. पहिल्या सामन्यात रहाणेला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले त्यामुळे पुढील दोन्ही सामन्यात त्याला बाहेर बसावे लागले. याबाबत धोनीने सांगितले कू त्याला भारतीय उपखंडात स्ट्राईक रोटेट करण्यात अपयश येते. परंतु परदेशातल्या आपल्या कामगिरीने सर्वांना मोहित करुन टाकल्यानंतर एका सामन्यातल्या कामगिरीवरुन बाहेर बसावे लागले.
      काही दिवसांनंतरच निवडकर्त्यांनी त्याला कर्णधार म्हणून झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवड करुन सगळ्यानाच उत्तर दिले. कर्णधार म्हणून खेळलेल्या आपल्या पहिल्याच दौऱ्यात एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली तर टी-२० मालिका १-१ ने बरोबरीत राखली.धोनीच्या कसोटीतुन निवृत्ती घेतल्यानंतर रहाणेला कसोटी संघाचा उपकर्णधारपदी निवडण्यात आले.  श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात ८ झेल घेऊन यष्टीरक्षका व्यतिरिक्त एका सामन्यात ८ झेल घेऊन विक्रम प्रस्थापित केला त्याच बरोबर कोलंबोमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावुन भारताला मोठी आघाडी मिळवुन दिली आणि यामुळे भारताने मोठा विजय मिळवुन मालिकेत बरोबरी साधली.श्रीलंकेनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात झालेल्या एकदिवसीय मालिकेत ३ अर्धशतके झळकावली पण त्यानंतरच्या कसोटी मलिकेतील पहिल्या तीन सामन्यात एक अर्धशतक सुद्धा झळकावता आले नाही याची भरपाई त्याने फिरोजशाह कोटला येथे झालेल्या शेवटच्या सामन्यात दोन्ही डावात शतक झळकावुन केली. त्याच्या कामगिरीचे बक्षिस म्हणून यावर्षी त्याला "अर्जुन पुरस्काराने" गोरविण्यात आले.
      २०१६ च्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत चौथ्या क्रमांकावर येत ४ सामन्यात दोन अर्धशतकांसह १४१ धावा काढल्या तर दुखापतीमुळे पाचव्या सामन्यांत त्याला संघाबाहेर बसावे लागले तर युवराज व रैनाचा टी-२० च्या संघात समावेश झाल्याने रहाणेला आंतिम अकरा मध्ये संधी मिळाली नाही. २०१६ च्या आयपीएल मोसमात रहाणेने नवीन तयार झालेल्या रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे प्रतिनिधीत्व केले. या सत्रात त्याने पाच अर्धशतकांच्या मदतीने ३४३ धावा केल्या ते ४९ च्या सरासरीने. रहाणेनी त्याच्या कारकिर्दीतील आजपर्यंतच्या सर्व परदेश दौऱ्यात कौतुकास पात्र कामगिरी केली असल्याने वेस्ट इंडिज दौऱ्यात सुद्धा त्याच्या कडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती त्याप्रमाणे त्याने ३ सामन्यांतील ४ डावांत एक शतक आणि एक अर्धशतकाच्या मदतीने २४३ धावा काढल्या व परदेशातील आपल्या कामगिरीतील सातत्य कायम राखले.
      न्युझिलंडविरूध्दच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत एक अर्धशतकासह १३६ धावा काढल्या पण त्यांने आपला जलवा दाखवला तो तीसऱ्या व अंतिम सामन्यात त्यात त्याने १८८ धावांची धडाकेबाज खेळी केली व विराट कोहली सोबत १६५ धावांची भागीदारी करत भारताला पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारुन दिली आणि भारताने ३-० ने मालिका जिंकली परंतु कसोटी मालिकेसारखा प्रभाव त्याला एकदिवसीय मालिकेत पाडता आला नाही आणि पाच सामन्यात फक्त एका अर्धशतका सह १४३ धावा काढल्या. रहाणेची कसोटीतील कामगिरी वरचेवर वेगळी पातळी गाठत होती पण कसोटीप्रमाणे एकदिवसीय सामन्यात कामगिरी करण्यात त्याला यश येत नव्हते तसेच इंग्लंड विरूद्धच्या कसोटीमालिकेतील पहिल्या तीन सामन्यात तर ३० चा आकडाही पार करता आला नाही व दुखापतीने त्याला उर्वरित दोन सामन्यांना मुकावे लागले लवकरात लवकर तो संघात परतेल अशी आशा आहे.
      ज्याप्रकारे अजिंक्यने परदेशातल्या कामगिरीने क्रिकेटप्रमींना मोहुन टाकले त्याचप्रकारे घरच्या प्रेक्षकांसमोर सुद्धा तो त्याचप्रकारे कामगिरी करेल अशी आशा आहे. जेव्हा एकदिवसीय संघाच्या अंतिम ११ मध्ये रहाणेला बाहेर बसावे लागते तेव्हा तो क्रिकेट राजकारणाचा बळी ठरतो का? असे वाटते. एक दोन सामन्यांत स्ट्राईक रोटेट करण्यात अपयश आल्यानंतर हा खेळाडु उपखंडात एकदिवसीय सामन्यामध्ये चांगली कामगिरी करुच शकत नाही ही गोष्ट चुकिची आहे. कारण त्याची देशांतर्गत तसेच परदेश दौऱ्यातील कामगिरी यामुळे अजिंक्य रहाणे सारख्या फलंदाजाला व उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला अंतिम ११ मध्ये संधी न देणे म्हणजे सामना खेळण्यापुर्वीच संघाला भगदाड पडण्यासारखे आहे.      
शंतनु कुलकर्णी

No comments:

Post a Comment