Sunday, 31 July 2016

जिम लेकर


एकदिवसीय क्रिकेट तसेच टि-२० क्रिकेटमध्ये ज्याप्रकारे फलंदाज महत्त्वाची भुमिका निभावतो त्याच वेळेस कसोटीचा विचार करता गोलंदाजाची कामगिरी महत्त्वाची ठरते. कारण सामन्यात २० फलंदाज बाद करुन संघाला विजय प्राप्त करुन देतो. फलंदाजाची शतकी खेळी आणि गोलंदाजाच्या ५ विकेट दोघांची कामगिरी समान मानली जाते.१३९ वर्षांच्या क्रिकेट इतिहासात अनेक दर्जेदार गोलंदाजांनी आपल्या कामगिरीने आपले नाव सुवर्ण अक्षरात लिहिले मग त्यात कसोटी इतिहासात पहिल्यांदा ५०० बळींचा टप्पा पार पाडणारा वेस्ट इंडिजचा कर्टनी वॉल्श असो वा ८०० बळींचा टप्पा पार पाडणारा श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन यांनी युवा गोलंदाजांसाठी एक लक्ष्य निर्माण करुन ठेवले आहे. त्याचप्रमाणे इंग्लंडच्या जिम लेकर यांनी एका सामन्यात सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम  आपल्या नावे केला आहे.
पण इतक्या वर्षांच्या क्रिकेट इतिहासात एका डावात दहा बळी बाद करण्यात फक्त दोन गोलंदाजांना यश आले. त्यातील पहिले होेते इंग्लंडचे फिरकी गोलंदाज जिम लेकर आणि सध्याचे भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना. ३१ जुलै १९५६ साली आेल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात जिम लेकर यांनी ही कामगिरी केली. या  सामन्यातील दुसऱ्या डावात त्यानी  धावात 10 गडी बाद केले. त्यांच्या गोलंदाजीचे पुथ:करण ५१.२-२३-५३-१० असे होते तर सामन्यात ९० धावांत १९ गडी बाद केले. याच अॅशेस मालिकेत त्यांनी तब्बल ४६ गडी बाद केले आणि इंग्लंडला २-१ ने मालिका विजय प्राप्त करुन दिला.
जिम लेकर यांनी कसोटी कारकिर्दीत ४६ सामन्यात १९३ गडी बाद केले तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४५० सामन्यात त्यांनी तब्बल १९४४ गडी बाद केले. २३ ऑगस्ट २००९ साली जिम लेकर यांचा आयसीसीच्या हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला.

शंतनु कुलकर्णी



Sunday, 24 July 2016

कॅरेबियनचा बादशहा सुनिल मनोहर गावसकर

कॅरेबियन उत्तर अमेरिका खंडातील बेटांचा समुह. यातील प्रत्येक बेट एक देश म्हणून गणला जातो. यात जमैका, त्रिनीदाद, सेंट ल्युसिया तसेच सेंट किट्स यांसारख्या देशांचा समावेश होतो. क्रिकेट सोडल्यास इतर सर्व खेळांमध्ये त्या त्या देशांचे नेतृत्व करतात तर फक्त क्रिकेटमध्ये हे सर्व देश ऐकत्रित येऊन वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व आंतरराष्ट्रीय़ पातळीवर करतात.
सुनिल मनोहर गावसकर मुंबईमध्ये जन्मलेल्या या खेळाडूने क्रिकेटविश्वात आपल्या खेळाने सर्वांना आकर्षित केले. सुनिल गावसकर म्हणजे 'उंची लहान किर्ती महान' असे व्यक्तिमत्व. १९७१ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यात गावसकरांचा संघात समावेश झाला. परंतु दुखापतीमुळे पहिल्या सामन्यातुन बाहेर बसावे लागले. तरीही गावसकरांनी आपली पदार्पणाची मालिका आपल्याच नावे केली. 

त्रिनीदाद मध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात दोन्ही डावात अर्धशतके झळकावली आणि वेस्ट इंडिजविरुदध पहिला विजय मिळवला, हाच विजय भारताला मालिका जिंकवण्यात महत्त्वाचा ठरला. त्यानंतरच्या कसोटीत गावसकरांनी कारकीर्दीतले पहिले शतक झळकावले आणि विक्रम स्थापन होण्यास सुरुवात झाली. आपल्या या खेळीत त्यांनी फ्लिक, स्ट्रेट ड्राईव्ह, स्केअर कट तसेच पुल यासारख्या फटक्यांची मेजवानी दिली आणि नव्या युगाला सुरुवात झाली. या मालिकेत ८ डावांत ४ शतके व ३ अर्धशतकासहीत ७७४ धावा ठोकल्या. यात शेवटच्या कसोटीत शतक आणि व्दिशतक झळकावले. वेस्ट इंडिजविरुद्ध २७ सामन्यात सर्वाधिक १३ शतके आणि २७४९ धावांचा विक्रमही गावसकरांच्या नावे आहे. १३ शतकांमधील ७ शतके त्यांनी वेस्ट इंडिजमध्ये फटकावली. गावसकरांनी आपल्या कारकिर्दीत कधीही हेल्मेट वापरले नाही त्यानी फक्त पांढरी गोल टोपी आणि त्यासोबत डोक्यासाठी सुरक्षित कवच वापरले. परंतु ज्याप्रकारे गावसकरांनी वेस्ट इंडिजच्या तोफखाना समजल्या जाणाऱ्या गोलंदाजांचा सडेतोड समाचार घेतला.

साल १९७१ पूर्वी भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध एकही सामना जिंकला नव्हता. एका तगड्या संघाला त्यांच्याच देशात हरवणे तितकेच अवघड होते परंतु हे काम केले ते मुंबईकर त्यावेळचा भारताचा कर्णधार अजित वाडेकर आणि सुनिल गावसकर त्यांना साथ दिली दिलीप सरदेसाई यांनी. १९७०-७१ ची मालिका जिंकवण्यात दिलीप सरदेसाई यांनी ६४२ धावा फटकावत गावसकरांना चांगली साथ दिली. भारताला जागतिक क्रिकेटमध्ये नवी दिशा देण्यास १९७०-७१ सालची वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका महत्त्वाची ठरली.

गावसकरांनी याच कामगिरीची पुनरावृत्ती १९७८-७९ च्या मायदेशात झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या मालिकेत केली त्यात त्यांनी ७३२ धावांचा पाऊस पाडला. कसोटी कारकिर्दीत १०००० धावांचा पल्ला पार करण्याचा पहिला मान गावसकरांच्या नावोच आहे तसेच त्यांचा ३४ शतकांचा विक्रमही कित्येक वर्षे त्यांच्याच नावे होता त्यानंतर सचिन तेंडूलकरने मोडला. त्यामुळे 'कॅरेबियनचा बादशहा' म्हणून लिटल मास्टर सुनिल गावसकर नेहमिच अग्रस्थानी राहतील.

शंतनु कुलकर्णी

Saturday, 23 July 2016

अष्टपैलु अश्विन

रवीचंद्रन अश्विन कसोटी क्रमावारीतील दुसऱ्या स्थानावरील गोलंदाज तसेच अष्टपैलुंमध्ये अग्रस्थानी. अश्विनची अष्टपैलु कामगिरी भारतीय संघात समतोल निर्माण करते. विराट कोहली आणि अनिल कुंबळेच्या जोडीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात अश्विनला वृद्धिमान साहाच्या अगोदर फलंदाजीस पाठवून सर्वांनाच धक्का दिला. यासंधीचा अश्विनने पुरेपुर फायदा उठवला. तसे पाहता यापुर्वीसुद्धा अश्विनने आपल्या फलंदाजीची छाप सोडली आहे. परंतु विदेशी भुमिवरील कामगिरी नेहमीच अग्रस्थानी राहते.

अश्विनने आपल्या कारर्दीतील तीसरे शतक झळकावत ११३ धावांची खेळी करत २५३ चेंडूंचा सामना केला. केलेल्या चेंडूचा आकडा पाहता अश्विनच्या बचावाची कल्पना येते. शतकी खेळी करत अश्विनने कोहलीसोबत पाचव्या विकेटसाठी १६८ धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. फलंदाजीला आल्यानंतर सुरुवातीस चाचपडणाऱ्या अश्विनने त्यानंतर प्रत्येक वेस्ट इंडिज गोलंदाजांना सडेतोड उत्तर दिले. गोलंदाजांना अश्विनचा बचाव भेदणे अशक्य ठरत होते. ४३ धावांवर असताना अश्विनचा झेल यष्टीरक्षकाने सोडला, या संधीचा त्याने पुरेपुर फायदा उठवला. अश्विनची शतकी खेळी कट, लेट कट, स्ट्रेट ड्राईव्ह तसेच शॉर्ट पुल यासारख्या फटक्यांनी बहरली.

कोहली बाद झाल्यानंतर अश्विनने वृद्धिमान साहासोबत ७१ तसेच अमित मिश्रासोबत ५१ धावांची भागिदारी करुन भारताला पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारुन दिली. यापुर्वी झालेल्या दक्षिण आफ्रिका, न्युझिलंड व ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अश्विनला नेमक्याच संधी मिळाल्या पण त्यात त्याला गोलंदाजीत छाप पाडता आली नव्हती त्यामुळे वेस्ट इंडिजमध्ये अश्विनला गोलंदाजीत महत्त्वपुर्ण कामगिरी करावी लागेल. अश्विनने फलंदाजीत सातत्या राखत ३३ कसोटीत ३ शतके आणि ६ अर्धशतकांसह १३१७ धावा ठोकल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे सर्वच्या सर्व शतके वेस्ट इंडिजविरुद्ध झळकावली आहेत. याप्रकारची कामगिरी त्याने गोलंदाजीमध्ये कारावी हीच इच्छा.

शंतनु कुलकर्णी.