Tuesday, 5 December 2017

रविंद्र जडेजा

सध्याच्या भारतीय संघाच्य़ गोलंदाजीचा महत्त्वाचा घटक. गुजरातमध्ये जन्मलेल्या या खेळाडुने कमी वयातच सौराष्ट्राच्या रणजी संघात प्रवेश मिळवला. घरची परिस्थिती बेताची असताना जडेजाने परिश्रम करुन जागतिक क्रिकेटमध्ये आपले नाव कमावले. वयाच्या १६ व्या वर्षी त्याने भारताच्या युवा संघात स्थान मिळवले आणि २००६ व २००८ साली आलेल्या युवा विश्वचषकामध्ये भारताचे प्रतिनिधित्त्व केले. जिथे एखाद्या खेळाडुला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत नाही तिथे जडेजाने दोनदा युवा विश्वचषकात खेळला. २००६ मध्ये त्याला इतकी संधी मिळाली नाही पण पाकिस्तानविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात १६ धावांत ३ गडी बाद केले आणि याची पुनरावृत्ती त्याने २००८ च्या विश्वचषकात करत भारताला विश्वचषकात करत भारताला विश्वचषक जिंकुन देण्यात हातभार लावला.
युवा विश्वचषकात केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्याला २००८ व २००९ मध्ये शेन वॉर्नच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्सचे आयपीएलमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. यातील २००८ मध्ये राजीस्थानने विजेतेपदकाला गवसणी घातली त्यात अष्टपैलु रविंद्र जडेजाचा मोलाचा वाटा होता. रविंद्र जडेजाने कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय संघात प्रवेश मिळवला आणि पहिल्याच एकदिवसीय सामन्यात अर्धशतकी खेळी केली. २०१२ मध्ये जडेजा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तीन त्रिशतके झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज बनला यासोबतच तो डॉन ब्रॅडमन, ब्रायन लारा, डब्लु जी ग्रेस, माईक हसी, ग्रॅहम हीक, बील पॉनसफोर्ड, वॉल्टर हॅमंड यांसारख्या दिग्गजांच्या यादीत जाऊन बसला महत्त्वाची बाब म्हणजे त्याने हा पराक्रम वयाच्या २३ व्या वर्षी केला. तीन त्रिशतकांमधील दोन त्रिशतके त्याने २०१२ च्या सत्रात केली याच कामगिरीच्या जोरावर त्याला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी पदार्पणाची संधी मिळाली.२००८-०९ च्या रणजी मोसमात त्याने ४२ बळी व ७३९ धावा फटकावत अष्टपैलु कामगिरी करत भारताच्या एकदिवसीय संघात स्थान मिळवले परंतु २००९ च्या टी-२० विश्वचषकातील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातील कामगिरीमुळे त्याला टिकाकारांना सामोरे जावे लागलेहोते.
कसोटी मालिकेनंतर झालेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात जडेजाने ६१ धावांची आक्रमक खेळी केली ती फक्त ३७ चेंडूत तसेच गोलंदाजीत १२ धावांत २ गडी बाद करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. परंतु जडेजाच्या कारकिर्दीला खरी कलाटणी दिली ती २०१३ मध्ये भारताने मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेला ४-० ने विजय या मालिकेत जडेजाने तब्बल २४ गडी बाद केले त्यात त्याने ५ वेळेस ऑस्ट्रेलियाचा कर्णधार राहिलेल्या मायकेल क्लार्कला आपला बकरा बनवला. यातील शेवटच्या सामन्यातील दुसऱ्या डावात ५ बळी घेत सामनावीराचा पुरस्कार आपल्या नावे केला.
      त्यानंतर २०१३ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीत विजय संपादन करण्यात जडेजाने महत्तवाची भुमिका निभावली. या स्पर्धेत त्याने सर्वाधिक १२ गडी बाद करत "गोल्डन बॉल" चा मानकरी ठरला यात वेस्ट इंडिजविरुद्ध ३६ धावा देत ५ गडी तसेच अंतिम सामन्यात नाबाद ३६ व २४ धावा देत २ गडी सुद्धा बाद केले. या कामगिरीनंतर जडेजाने आयसीसीच्या गोलंदाजांच्या एकदिवसीय क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावला. याआधी भारताकडुन कपिल देव, मनिंदर सिंग व अनिल कुंबळेने भारताकडुन क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावला होता.आयपीएलमध्ये जडेजाने २००८-०९ मध्ये राजस्थान रॉयल्सचे, २०११ मध्ये कोची तस्कर्सचे प्रतिनिधित्व केले पण २०१२ च्या सत्रासाठी झालेल्या बोलीत चेन्नई सुपरकिंगने जडेजाला तब्बल २० ताख डॉल्रर्सला खरेदी केले. २०१२-१५ या ४ सत्रापैकी ३ वेळेस संघाला आपल्या कामगिरीच्या जोरावर अंतिम फेरीत घेऊन गेला. याच काळात जडेजा "सर जडेजा" म्हणून ओळखला जाऊ लागला आणि धोनीचा विश्वासु खेळाडू बनला.
      २०१५ हे वर्ष जडेजासाठी तितकेसे लाभदायक ठरले नाही. २०१५ च्या विश्वचषकात त्याची कामगिरी सरासरी झाली मग ती गोलंदाजीत असो वा फलंदाजीत. विश्वचषकानंतर बांग्लादेशविरुद्धच्या मालिकेत केलेल्या खराब कामगिरीमुळे त्याला संघातले स्थान गमवावे लागले. परंतु जडेजाने अपयश विसरुन रणजी मोसमात जोरदार कामगिरी करत ४ सामन्यांत ३८ विकेट घेतल्या यांत ६ वेळेस एका डावात ५ गडी बाद केले तसेच फलंदाजीत ३ अर्धशतके झळकावत २१५ धावा फटकावल्या. या कामगिरीच्या जोरावर त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत पुनरागमन केले आणि या मालिकेत त्याने रणजी सामन्यांप्रमाणेच गोलंदाजीत आपला जलवा दाखवत चार सामन्यांत २३ बळी घेतले व खालच्या क्रमांकावर महत्त्वाच्या खेळी केल्या.
      २०१६ साली न्युझिलंडविरुद्धच्या मालिकेतही त्याने आपला अष्टपैलु खेळ दाखवला व कानपुर येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीसामन्यांत ६ बळी व १२ धावा अशी कामगिरी करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. न्युझिलंडविरुद्धच्या मालिकेप्रमाणेच इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अश्विन व जडेजाच्या फिरकीचा दबदबा राहिला. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अश्विनने २८ तर जडेजाने २६ विकेट घेत इंग्लंडच्या फलंदाजीतली हवाच काढली. यात चेन्नई येथे झालेल्या शेवटच्या कसोटीत भारताला अखेरच्या दिवशी १० गडी बाद करण्याची आवश्यकता होती. एकवेळ इंग्लंड संघ २ बाद ११० अशा स्थितीत होतो पण जडेजाच्या फिरकीने त्यांची कंबरच मोडली आणि त्यांचा डाव २०७ धावांत आटोपला व भारताने ४-० ने मालिका खिशात घातली. या सामन्यांत जडेजाने १० बळी व धडाकेबाज अर्धशतकही झळकावले. या संपुर्ण मालिकेत गोलंदाजीबरोबरच खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन २२४ धावांचे योगदान सुद्धा दिले.जडेजा हा त्याच्या गोलंदाजी शैलीने च्रर्चेत राहतो तो फलंदाजांना दोन चेंडूमधील वेळेत विचार सुद्धा करण्याची संधी देत नाही आपले षटक पटकन पुर्ण करतो त्यामुळे फलंदाजांवर दडपण निर्माण होते.

शिखर धवन

सेहवाग,गंभीर सोबतच दिल्लीचा आणखी एक आघाडीचा फलंदाज. आपल्या ताबडतोड फलंदाजीने त्याने सर्वांचे लक्ष वेधले.धवनचे पहिल्यांदा नाव आले ते २००४ मध्ये बांग्लादेशमध्ये झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात ज्यात त्याने ५०५ धावा फटकवल्या आणि भारताला अंतिम फेरीत धडक मारुन दिली. भारताला अंतिम फेरीत पराभव स्विकारावा लागला पण तो मालिकावीराचा मानकरी ठरला.तसेच तो देशांतर्गत स्पर्धांमध्ये खोऱ्याने धावा काढत होता.आ­­­­यपीएलच्या सुरुवातीच्या वर्षात त्याला सेहवाग,गंभीरसोबत दिल्ली डेयरडेव्हिल्सचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली यात त्याने भरपुर धावा केल्या.
त्याला आंतरराष्ट्रीय संघात संधी मिळाली ती २०१० साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत.पदार्पणात कामगिरी करता आली नाही पण त्याने देशांतर्गत स्पर्धात जोमाने कामगिरी केली या कामगिरीचे बक्षिस म्हणून त्याला सलामीवीर म्हणून संधी मिळाली ती २०११ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यात त्यात त्याला फक्त एका अर्धशतकाच्या मदतीने ५८ धावा करता आल्या आणि पुन्हा संघाबाहेर व्हावे लागले. परंतु त्याची देशांतर्गत स्पर्धेतील कामगिरी आणि सेहवाग व गंभारची अपयशी मालिका बघता त्याला पुन्हा संधी मिळण्याची आशी होती.
      २०१३ च्या रणजी ट्रॉफी तसेच इराणी ट्रॉफीतल्या कामगिरीच्या जोरावर सेहवागच्या जागी त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यासाठी संघात समावेश करण्यात आला.पदार्पणाच्या कसोटी सामन्यात त्याने १८७ धावा केल्याआणि भारताला पहिल्या डावात मोठी आघाडी घेऊन विजय मिळवण्यात महत्त्वाची भुमिका बजावली.पण क्षेत्ररक्षण करताना झालेल्या दुखापतीने त्याला दुसऱ्या डावात फलंदाजी करता आली नाही व शेवटच्या कसोटीला मुकावे लागले.धवनने आयपीएल मध्ये दिल्ली,मुंबई तसेच सध्या हैद्राबादचा कर्णधार म्हणून नेतृत्व केले आहे.२०१२ च्या स्पर्धेत त्याने हैद्राबादकडुन सर्वाधिक धावा केल्या होत्या.
२०१३ ची चॅम्पियन ट्रॉफी,धवनला पुन्हा एकदा एकदिवसीय संघात स्थान मिळाले. या स्पर्धेत नवीन सलामी जोडी उतरवली ती म्हणजे धवन आणि रोहित शर्मा.या स्पर्धेत या सलामी जोडीने पाच सामन्यात दोन शतकी व दोन अर्धशतकी सलामी भागीदारी केल्या.तसेच धवनने या स्पर्धेत दोन शतके व एका अर्धशतकाच्या मदतीने सर्वाधिक धावा केल्या. त्यानंतरही धवनची बॅट तळपतच राहिली. २०१३ सालची मायदेशातील ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका भारताच्या पहिल्या तीन फलंदाजांनीच गाजवली यात धवनने एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली.
      धवनने जसे एकदिवसीय सामन्यात सातत्य राखले तसे त्याला कसोटीत राखता आले नाही. इंग्लंड दौऱ्यात ६ डावात त्याला फक्त ३७ धावा करण्यात यश आले. त्यामुळे त्याला उर्वरीत सामन्यात बाहेर बसावे लागले. श्रीलंकेविरुद्धच्या मायदेशातील एकदिवसीय मालिकेत सातत्य राखत एका शतकासह दोन अर्धशतके झळकावली. विश्वचषकापुर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत धवनला पुन्हा एकदा अपयश आले आणि त्याच्या जागी के एल राहुलला संधी देण्यात आली. कसोटीतील अपयश विसरुन त्याने २०१५ च्या विश्वचषकात भारताकडुन सर्वाधिक धावा काढण्याचा मान मिळवला.
             विश्वचषकानंतर झालेल्या बांग्लादेशदौऱ्यात त्याने कसोटीत १७३ धावांची खेळी केली तसेच श्रीलंकेत झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात शतक झळकावले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. २०१६ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत धवन पहिल्या दोन सामन्यात अनुक्रमे ९ व ६ धावा काढता आल्या पण पुढील तीन सामन्यांत त्याने १ शतक व २ अर्धशतक झळकावले. चौथ्या सामन्यात १२६ धावांची खेळी करत कोहलीसोबत दुसऱ्या गड्यासाठी २१२ धावांची भागिदारी केली पण त्यानंतर बाकीच्या फलंदाजांच्या अपयशामुळे भारताला २५ धावांनी पराभव स्विकारावा लागला. एकदिवसीय मालिकेनंतरच्या टी-२० मालिकेत धवन एकदिवसीय मालिकेतल्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात अपयशी ठरला. तसेच त्यानंतरच्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत ५१ व नाबाद ४६ धावांची खेळी करत मालिका विजयात महत्त्वाची भुमिका पार पाडली तर आशिया चषकाच्या बांग्लादेशाविरुद्धच्या अंतिम सामन्यात ६० धावांची खेळी केली.
      आशिया चषकानंतर भारतात झालेल्या टी-२० विश्वचषकात धवन पुर्णपणे अपयशी ठरला त्यामुळेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या उपांत्य सामन्यात धवनच्या जागी रहाणेला संधी मिळाली. तर वेस्टइंडिज दौऱ्यातील पहिल्या सामन्यातील ८४ धावा सोडल्यास धवन २० धावांचा टप्पाही गाठु शकला नाही. त्यानंतर न्युझिलंडविरुद्धच्या कसोटी संघात धवनचा समावेश होता पण त्याच्या जागी राहुलला संधी दिली परंतु दुसऱ्या सामन्यापुर्वी राहुल दुखापतग्रस्त झाल्याने धवन दुसऱ्या कसोटीत खेळला त्यात तो अपयशी ठरला आणि स्वत: दुखापतग्रस्त झाला व उर्वरीत मालिका आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेला मुकावे लागले. सद्यस्थितीत भारताकडे एकदिवसीय सामन्यांसाठी रोह्त शर्मा, राहुल, रहाणे तर कसोटीसाठी विजय, राहुल आणि गरज पडल्यास पुजाराही सलामीला खेळु शकतो त्यामुळे धवनला जर येणाऱ्या ऑस्ट्रेलिया, बांग्लादेशविरुद्धच्या आणि त्यानंतर चॅम्पियन ट्रॉफीच्या संघात स्थान मिळवायचे असेल तर त्याला कामगिरीसोबतच तंदरुस्तीवर सुद्धा लक्ष द्यावे लागेल.आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये त्याला आयपीएल सारखी कामगिरी करता आली नाही. सद्य स्थितीत भारताकडे कसोटीसाठी सलामी खेळाडु आहेत त्यामुळे धवनला जर कसोटी संघात स्थान टिकवायचे असेल तर कसोटीतील कामगिरी सुधारावी लागेल.

Sunday, 2 October 2016

अजिंक्य रहाणे


      सध्याच्या भारतीय कसोटी संघातील एक भरवशाचा खेळाडु. युवा कसोटी संघाचा अविभाज्य घटक आणि उपकर्णधार. ज्याप्रकारे सुरुवातीच्या काळात संघात कमीत कमी ५-६ खेळाडु हे मुंबईचे असायचे ज्यात सुनील गावसकर, संदिप पाटील, रवी शास्त्री, अंशुमन गायकवाड, दिलीप वेंगसरकर, संजय मांजरेकर, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, वासिम जाफर आणि आता रोहित शर्मा व अजिंक्य रहाणे मुंबईच नाव पुढं नेत आहेत. मध्यंतरीच्या काळात फक्त सचिन तेंडुलकर मुंबईचा एकमेव खेळाडु भारताच प्रतिनिधित्व करत होता. सचिनच्या क्रिकेट कारकिर्दीच्या शेवटच्या सामन्यांमध्ये अजिंक्यला पदापर्णाची संधी मिळाली. अजिंक्यने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत पदार्पण केले तर इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय व टी-२० मध्ये पदापर्ण केले. अजिंक्यने सातत्याने देशांतर्गत स्पर्धांमध्ये खोऱ्याने धावा काढल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पाच हजारापेक्षा जास्त धावा काढत मुंबई संघाचा महत्त्वाचा खेळाडु बनला.

अजिंक्यच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा क्षण म्हणजे राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली राजस्थानसाठी आयपीएल मध्ये खेळण्याची संधी भेटली आणि सलग ३-४ वर्षे सलामीला येऊन द्रविडचा निर्णय सार्थ ठरविला आणि विश्वास जिंकला. राजस्थानसाठी केलेली कामगिरी ती फलंदाजीत असो वा क्षेत्ररक्षणात स्वत:ला पुर्णपणे झोकुन देऊन संघाला अनेक विजय मिळवुन दिले. २०१३ चा पदार्पणाचा सामना आणि त्यानंतर २०१५ ची आफ्रिकेविरुद्धची मालिका फक्त अजिंक्यने मायदेशात खेळल्या. या दोन वर्षांत त्याने दक्षिण आफ्रिका, न्युझिलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश आणि श्रीलंका या तगड्या संघांविरुद्ध त्यांच्याच देशात नेटाने फलंदाजी केली. जिथे पुजारा, विजय, धवन, रोहित यांच धावा काढण्यात सातत्य नसताना अजिंक्यने भारताला तारले आणि स्टेन, मॉर्केल,जॉनसन, स्टार्क यांना सडेतोड उत्तर दिले.
अजिंक्य रहाणेच्या छोट्याश्या कारकिर्दीमध्ये त्याने कसोटी सामन्यात न्युझिलंडविरुद्ध झळकावलेले पहिले शतक तसेच आफ्रिकेत केलेली ९६ धावांची खेळी सामना जिंकवण्यात जरी यशस्वी ठरली नसली तरी संघाच मनोधर्ये उंचवणारी नक्कीच होती आणि भारताला अजिंक्यच्या रुपाने मधल्या फळीतील फलंदाज गवसला जो परदेशी खेळपट्यांवर उत्तम प्रकारे खेळु शकतो. त्यानंतर एका मागे एक इंग्लंड दौरा, मायदेशातील एकदिवसीय मालिका आणि त्यानंतरचा मोठा ऑस्ट्रेलिया दौरा. इंग्लंड दौऱ्यात लॉर्डसवर झालेल्या कसोटी सामन्यात एक अविश्वसनिय खेळी करुन अजिंक्यने विजयात मोलाचा वाटा उचलला आणि भारताचे लॉर्डसवर कसोटी विजयाचे स्वप्न पुर्ण केले. त्याला साथ दिली ती इशांत शर्माने. ज्या ज्या वेळेस या विजयाची आठवण काढली जाईल त्या त्या वेळेस अजिंक्यच नाव "सामन्याचा हिरो" म्हणुन काढले जाईल. ज्या ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला आपल्या २४ वर्षांच्या कारकिर्दीतमध्ये अपयश आले तिथे अजिंक्यने आपल्या कसोटी कारकिर्दीतल्या सुरुवातीलाच लॉर्डसवर शतक झळकावले.
      भारतीय युवा संघाला परदेशीभुमीवर फक्त कसोटीसामन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अपयश आले पण एकदिवसीय सामन्यामध्ये युवा भारतीय संघ कोणत्याही संघाला सामोरा जाऊ शकतो हे २०१४ ची इंग्लंडमधील एकदिवसीय़ मालिका जिंकुन दाखवुन दिले. रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याने अजिंक्यला सलामीला यावे लागले आणि मिळालेल्या संधीचा त्याने पुरेपुर फायदा घेत पहिले शतक झळकावले आणि धवन सोबत मोठी भागिदारी करत भारताला मोठा विजय मिळवुन देत मालिकाही जिंकुन दिली. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत पुन्हा एकदा अजिंक्यची बॅट तळपली आणि पहिल्याच सामन्यात धवन सोबत पहिल्या गड्यासाठी २३१ धावांची भागिदारी करत दुसरे शतक झळकावले व भारताला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली.
      श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर भारताच्या युवा संघासाठी एक खडतर दौरा होता ऑस्ट्रेलियाचा ज्यात चार कसोटी सामने, तिरंगी मालिका आणि त्यानंतर होणारी २०१५ ची विश्वचषक स्पर्धा. पहिल्या दोन सामन्यात भारताचा पराभव झाला, तीसऱ्या सामन्यात अजिंक्यने कोहलीसोबत चौथ्या गड्यासाठी २६२ धावांची महत्त्वाची भागिदारी करत भारताला मोठी भावसंख्या उभारुन दिली आणि परदेशातील कामगिरी करण्याची मालिका सुरुच ठेवली परंतु त्याला तिरंगी मालिकेत अपयश आले. आपल्या कारकिर्दीतल्या पहिल्या वहिल्या विश्वचषकाच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अजिंक्यला अपयश आले पण याची भरपाई त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात तडाखेबाज अर्धशतकी खेळी खेळन भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात केली आणि विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. ऑस्ट्रेलियातल्या मोठ्या मैदानावर क्षेत्ररक्षणातही त्याने कोहली व जडेजाच्या साथीने अनेक धावा रोखण्यात मदत केली.
      विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाकडुन हार पत्कारल्यानंतर भारताला बांग्लादेशमध्ये एकदिवसीय मालिका खेळायची होती व या मालिकेत काही खेळाडुंना विश्रांती देऊन नवीन खेळाडुंना संधी मिळण्याची आशा होती पण विश्वचषकात सहभागी झालेला संघच कायम ठेवण्यात आला. कारण काही दिवसांपुर्वी त्यांनी पाकिस्तानचा ३-० ने धुव्वा उडवला होता. पहिल्या सामन्यात रहाणेला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले त्यामुळे पुढील दोन्ही सामन्यात त्याला बाहेर बसावे लागले. याबाबत धोनीने सांगितले कू त्याला भारतीय उपखंडात स्ट्राईक रोटेट करण्यात अपयश येते. परंतु परदेशातल्या आपल्या कामगिरीने सर्वांना मोहित करुन टाकल्यानंतर एका सामन्यातल्या कामगिरीवरुन बाहेर बसावे लागले.
      काही दिवसांनंतरच निवडकर्त्यांनी त्याला कर्णधार म्हणून झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवड करुन सगळ्यानाच उत्तर दिले. कर्णधार म्हणून खेळलेल्या आपल्या पहिल्याच दौऱ्यात एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली तर टी-२० मालिका १-१ ने बरोबरीत राखली.धोनीच्या कसोटीतुन निवृत्ती घेतल्यानंतर रहाणेला कसोटी संघाचा उपकर्णधारपदी निवडण्यात आले.  श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात ८ झेल घेऊन यष्टीरक्षका व्यतिरिक्त एका सामन्यात ८ झेल घेऊन विक्रम प्रस्थापित केला त्याच बरोबर कोलंबोमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावुन भारताला मोठी आघाडी मिळवुन दिली आणि यामुळे भारताने मोठा विजय मिळवुन मालिकेत बरोबरी साधली.श्रीलंकेनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात झालेल्या एकदिवसीय मालिकेत ३ अर्धशतके झळकावली पण त्यानंतरच्या कसोटी मलिकेतील पहिल्या तीन सामन्यात एक अर्धशतक सुद्धा झळकावता आले नाही याची भरपाई त्याने फिरोजशाह कोटला येथे झालेल्या शेवटच्या सामन्यात दोन्ही डावात शतक झळकावुन केली. त्याच्या कामगिरीचे बक्षिस म्हणून यावर्षी त्याला "अर्जुन पुरस्काराने" गोरविण्यात आले.
      २०१६ च्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत चौथ्या क्रमांकावर येत ४ सामन्यात दोन अर्धशतकांसह १४१ धावा काढल्या तर दुखापतीमुळे पाचव्या सामन्यांत त्याला संघाबाहेर बसावे लागले तर युवराज व रैनाचा टी-२० च्या संघात समावेश झाल्याने रहाणेला आंतिम अकरा मध्ये संधी मिळाली नाही. २०१६ च्या आयपीएल मोसमात रहाणेने नवीन तयार झालेल्या रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे प्रतिनिधीत्व केले. या सत्रात त्याने पाच अर्धशतकांच्या मदतीने ३४३ धावा केल्या ते ४९ च्या सरासरीने. रहाणेनी त्याच्या कारकिर्दीतील आजपर्यंतच्या सर्व परदेश दौऱ्यात कौतुकास पात्र कामगिरी केली असल्याने वेस्ट इंडिज दौऱ्यात सुद्धा त्याच्या कडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती त्याप्रमाणे त्याने ३ सामन्यांतील ४ डावांत एक शतक आणि एक अर्धशतकाच्या मदतीने २४३ धावा काढल्या व परदेशातील आपल्या कामगिरीतील सातत्य कायम राखले.
      न्युझिलंडविरूध्दच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत एक अर्धशतकासह १३६ धावा काढल्या पण त्यांने आपला जलवा दाखवला तो तीसऱ्या व अंतिम सामन्यात त्यात त्याने १८८ धावांची धडाकेबाज खेळी केली व विराट कोहली सोबत १६५ धावांची भागीदारी करत भारताला पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारुन दिली आणि भारताने ३-० ने मालिका जिंकली परंतु कसोटी मालिकेसारखा प्रभाव त्याला एकदिवसीय मालिकेत पाडता आला नाही आणि पाच सामन्यात फक्त एका अर्धशतका सह १४३ धावा काढल्या. रहाणेची कसोटीतील कामगिरी वरचेवर वेगळी पातळी गाठत होती पण कसोटीप्रमाणे एकदिवसीय सामन्यात कामगिरी करण्यात त्याला यश येत नव्हते तसेच इंग्लंड विरूद्धच्या कसोटीमालिकेतील पहिल्या तीन सामन्यात तर ३० चा आकडाही पार करता आला नाही व दुखापतीने त्याला उर्वरित दोन सामन्यांना मुकावे लागले लवकरात लवकर तो संघात परतेल अशी आशा आहे.
      ज्याप्रकारे अजिंक्यने परदेशातल्या कामगिरीने क्रिकेटप्रमींना मोहुन टाकले त्याचप्रकारे घरच्या प्रेक्षकांसमोर सुद्धा तो त्याचप्रकारे कामगिरी करेल अशी आशा आहे. जेव्हा एकदिवसीय संघाच्या अंतिम ११ मध्ये रहाणेला बाहेर बसावे लागते तेव्हा तो क्रिकेट राजकारणाचा बळी ठरतो का? असे वाटते. एक दोन सामन्यांत स्ट्राईक रोटेट करण्यात अपयश आल्यानंतर हा खेळाडु उपखंडात एकदिवसीय सामन्यामध्ये चांगली कामगिरी करुच शकत नाही ही गोष्ट चुकिची आहे. कारण त्याची देशांतर्गत तसेच परदेश दौऱ्यातील कामगिरी यामुळे अजिंक्य रहाणे सारख्या फलंदाजाला व उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला अंतिम ११ मध्ये संधी न देणे म्हणजे सामना खेळण्यापुर्वीच संघाला भगदाड पडण्यासारखे आहे.      
शंतनु कुलकर्णी