Wednesday 10 August 2016

रोहित शर्मा

भारतीय एकदिवसीय संघाचा सलामीवीर. नागपुरमध्ये जन्मलेल्या या खेळाडुने मुंबईमध्ये आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. मुंबई म्हणजे देशातील क्रिकेटचे मुख्य केंद्र याच क्रिकेटसाठीच्या पोषक वातावरणात त्याने सुरुवातीला क्लब क्रिकेट,१९ वर्षांखालील स्पर्धात केलेल्या मेहनतीने व कामगिरीच्या जोरावर भारताच्या १९ वर्षांखालील संघात दाखल झाला. कालगिरीत सातत्य राखून त्याने मुंबईच्या रणजी संघात आणि त्यानंतर भारताच्या एकदिवसीय संघामध्ये समावेश झाला.

      २००७ साली पदार्पणाच्या सामन्यामध्ये त्याला ठसा उमटवता आला नाही पण ज्यावेळी सचिन,द्रविड आणि गांगुली यांनी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या टि-२० विश्वचषकात खेळण्यास नकार दिल्यानंतर एक युवा संघ स्पर्धेत पाठवण्यात आला त्यात रोहितचा समावेश होता.पहिल्या काही सामन्यात त्याला संधी मिळाली नाही पण दक्षिण आफ्रिकेविरुदधच्या महत्त्वाच्या सामन्यात त्याने संधीचे सोने केले.याच सामन्यात अर्धशतक झळकावत त्याने भारताला मोठी धावसंख्या उभारुन दिली तसेच क्षेत्ररक्षणात सुदधा चपळाई एका थेट फेकीवर फलंदाजाला धावबाद केले अशाच कामगिरीची पुनरावृत्ती करत अंतिम सामन्यात छोटेखानी पण महत्त्वाची खेळी केली आणि भारताला विश्वचषक जिंकवण्यात महत्त्वाची भुमिका निभावली.
२००८ साली ऑस्ट्रेलियात झालेल्या कॉमनवेल्थ चषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना त्याने एका कसलेल्या फलंदाजाप्रमाने फलंदाजी करत सचिनच्या साथीने मोलाची भागीदारी करुन भारताला मालिका जिंकुन दिली.टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडुन शतक झळकावण्याचा पहिला मान रोहितला जातो. निवृत्त खेळाडु तसेच भारताच्या सध्याच्या कर्णधाराला सुद्धा रोहितमध्ये असलेल्या क्रिकेट कौशल्यामुळे खूप अपेक्षा आहेत. संधी मिळत गेल्या पण रोहित हवी तशी कामगिरी करण्यात अपयशी ठरत होता. अपयशी ठरत असताना देखिल धोनी संधी देत होता आणि या कारणामुळे त्याला पत्रकारांना सुद्धा तोंड द्यावे लागत होते.
      आयपीएल मध्ये कामगिरी होत होती पण एकदिवसीय सामन्यात कामगिरी करण्यात तो अपयशी ठरत होता. त्यात २०१० साली कसोटीत पर्दापणाची संधी आली होती पण सामना सुरु होण्यापुर्वी फुटबॉल खेळताना दुखापत झाली आणि त्याला संधीपासुन मुकावे लागले.त्यानंतर सुमारे तीन वर्षांनंतर सचिनच्या निवृत्तीच्या मालिकेमध्ये त्याला संधी मिळाली आणि आलेली संधी दोन्ही हातांनी पकडुन दोन्ही सामन्यात शतके झळकावली.२०११ विश्वचषकाच्या संघात स्थान न मिळाल्याने निराश न होता त्याने कसुन मेहनत घेतली.
      आयपीएल मध्ये पहिली काही वर्षे हैद्राबाद संघाकडुन खेळला आणि प्रत्येक मालिकेत धावांचा पाऊस पाडत २००९ साली संघाला विजेतेपद मिळवुन दिले त्यानंतर त्याला मुंबई संघाकडुन सचिन सोबत खेळण्याची संधी मिळाली. २०१३ च्या आयपीएलमध्ये जेव्हा पॉंटिंगने कामगिरीत सातत्य नसल्यामुळे बाहेर बसने पसंत केले तेव्हा रोहितची कर्णधारपदी नेमणूक झाली. कर्णधारपदा बरोबरच त्याच्या कामगिरीतही सुधार आला आणि त्याने मुंबईला पहिल्यांदा चषक जिंकुन दिला. याच कामगिरीच्या जोरावर त्याला इंग्लंड मध्ये झालेल्या २०१३ सालच्या चॅंम्पियन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली पण यांमध्ये त्याला मधल्या फळीतील फलंदाज म्हणून नाही तर सलामीवीर म्हणून. मुरली विजय सारखा सलामीवीर संघात असुन सुद्धा धोनीने रोहितवर विश्वास दाखवला आणि रोहितने धोनीचा विश्वास सार्थ ठरवत संघाला चषक जिंकवण्यात मोलाचा वाटा उचलला.तेव्हापासुन लोक म्हणत असत की ''रोहित असलेल्या गुणांचा उपयोग करायला शिकला''.
      २०१३ ची ऑस्ट्रेलियाविरुद्धची मायदेशातील एकदिवसीय मालिका ज्यात मालिका २-२ बरोबरीत असताना शेवटचा सामना फलंदाजांसाठी अनुकुल असणाऱ्या बंगळुरच्या चिन्नस्वामी मैदानावर होता. मालिकेत मिळवलेल्या दोन्ही विजयात सलामीवीर (रोहित-धवन) व कोहली यांची भुमिका महत्त्वाची होती. त्यामुळे याही सामन्यात त्यांच्यावर जबाबदारी होता. त्यात पुन्हा एकदा रोहित-धवनने चांगली सलामी दिली आणि मोठ्या धावसंख्येचा पाया रचला त्यानंतर धवन व कोहली झटपट बाद झाले. दोन महत्त्वाचे गडी बाद झाल्यामुळे रोहितवर पूर्णपणे धावसंख्या पुढे नेण्याचा भार आला. पण पाहता पाहता रोहितने २०९ धावा ठोकल्या त्यात १६ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. यात त्याने एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावे केला. रोहितने मालिकाविराचा किताब पटकावला तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावलेला जगामध्ये सचिन आणि सेहवाग नंतर तीसरा खेळाडु ठरला त्यात तिघेही भारतीय. द्विशतक झळकावुन रोहितने सचिनचा विश्वास सार्थ करुन दाखवला.
२०१४ सालच्या श्रीलंकेविरुद्धच्या मायदेशातील एकदिवसीय मालिकेत दुखापतीमुळे रोहितला सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावे लागेल पण तंदरुस्ती सिद्ध करण्यासाठी श्रीलंकेविरुद्धच्या सराव सामन्यात धुवाधार फलंदाजी करुन भारतीय संघात पुनरागमन केले. ईडन गार्डन, कोलकत्ता येथे मालिकेच्या चौथ्या सामन्यात सुरुवात अडखळती होऊन सुद्धा रोहितने जम बसल्यावर त्याने त्याच्या भात्यातील सर्व फटके खेळून फलंदाजीचा आनंद लुटला आणि म्हणता म्हणता त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्वत:चे दुसरे द्विशतक झळकावले. यात त्याने २६३ धावा ठोकत एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली तसेच सामन्यात सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम आपल्या नावे केला.याच ईडन गार्डन मैदानावर २०१३ साली रोहितने कसोटीत पर्दापण केले. पर्दापणाच्या सामन्यात त्याने शतकी खेळी केली.
      २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले तसेच २०१५ च्या विश्वचषकातील उपउपांत्य सामन्यात बांग्लादेशविरुद्ध १३८ धावांची खेळी करुन भारताला मोठी धावसंख्या उभारुन दिली. त्यानंतर झालेल्या आयपीएल चषकात दुसऱ्यांदा मुंबईला विजेतेपद मिळवुन दिले. आफ्रिकेविरुद्ध मायदेशातील मालिकेत टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडुन शतक झळकावण्याचा मान मिळवला तसेच भारताकडुन टी-२० मध्ये सर्वोच्च धावा काढल्या तसेच एकदिवसीय मालिकेत १५० धावंची खेळी केली पण ही खेळी भारताला पराभवापासुन वाचवु शकली नाही.
      आपल्या दोन द्विशतकी खेळीने मर्यादित षटकांच्या सामन्यातील एक उत्कृष्ट फलंदाजामध्ये रोहितची गणना होऊ लागली.यात अजुन भर म्हणुन २०१६ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सलग दोन सामन्यात शतकी खेळी केल्या तसेच शेवटच्या सामन्यात ९९ धावांची खेळी केली करत मालिकाविराचा मान मिळवला. आतापर्यंत झालेल्या आयपीएल मध्ये फक्त दोन फलंदाजाना प्रत्येक सत्रात ३०० पेक्षा अधिक धावा करण्यात यश आले त्यात रोहितचा समावेश होतो. ऑस्टेलिया व श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेनंतर झालेल्या आशिया टी-२० चषकातील पहिल्याच सामन्यात बांगलादेशविरूद्ध ८३ धावांची महत्त्वपुर्ण खेळी केली पण उर्वरित मालिकेत रोहित पुर्णपणे अपयशी ठरला. त्यानंतरच्या टी-२० विश्वचषकात रोहितला एकही अर्धशतक झळकावता आले नाही फक्त उपांत्य सामन्यात ४३ धावांची खेळी करत उत्कृष्ट सुरुवात करून दिली होती. त्यानंतर आयपीएल सत्रात त्याने पाच अर्धशतकांच्या साह्याने ३८३ धावा काढल्या पण तो संघाला अंतिम चार मध्ये स्थान मिळवून देण्यात अपयशी ठरला. वेस्ट इंडिज दौऱ्यात रोहितला फक्त एका सामन्यात खेळण्याची संधी मिळाली त्यात त्याने दोन्ही डावात मिळुन ५० धावा काढल्या त्यानंतर अयोजित झालेल्या टी-२० मालिकेतल्या पहिल्या सामन्यात २४५ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ ५ व्या षटकात २ बाद ४८ अशा अवस्थेत होता परंतु त्यानंतर रोहितने राहूलच्या साथीने ७ षटकात ८१ धावांची भागिदारी करत भारताला स्थिरता मिळवून दिली होती त्यात रोहीतने ६९ धावांची खेळी केली होती पण भारतीय संघाला १ धावाने पराभव स्विकारावा लागला होता.
      न्युझिलंडविरूद्धच्या मालिकेतील तीनही सामन्यात रोहीतला खेळण्याची संधी मिळाली त्यातील पाच डावांत तीन अर्धशतकांच्या साह्याने २४० धावा फटकावल्या कसोटी मालिकेतनंतर झालेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या चार सामन्यात रोहितने १४, १५, १३ व ११ धावा काढल्या पण शेवटच्या सामन्यात ७० धावांची खेळी करताना दुखापतग्रस्त झाला त्यामुळे त्याचा इंग्लंडविरूद्धच्या मालिकेतसाठी संघातही समावेश झाला नाही बांगलादेश किंवा ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत तो पुनरागमन करू शकतो. रोहितला कसोटीसंघातले स्थान राखायचे असेल तर आतापर्यंतच्या परदेशदौऱ्यातील कामगिरी विसरुन पुढे जावे लागेल आणि तसेच भारताचा नवा कर्णधार हा परदेशात पाच गोलंदाज घेऊन खेळेल त्यामुळे स्वत:ची जागा कायम राखायची असेल तर कामगिरी सुधारणा आवश्यक आहे.

शंतनु कुलकर्णी

No comments:

Post a Comment