Tuesday 23 August 2016

मालिका २-० ने जिंकुन भारताची दुसऱ्या स्थानावर घसरण तर पाकिस्तान कसोटी मध्ये अग्रस्थानी विराजमान

एक छोटी गोष्ट काय बदल घडवु शकते हे काल संपलेल्या भारत-वेस्ट इंडिजच्या मालिकेत दिसुन आले. अखेरच्या सामन्यात खेळ झाला फक्त २२ षटकांचा आणि सलग चार दिवस एकही चेडू टाकला गेला नाही, सामना अनिर्णित राहिला. चौथ्या सामन्यापुर्वी, श्रीलंकेनी ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ३-० ने जिंकली तसेच पाकिस्तानने इंग्लंडला २-२ असे रोखले आणि भारतीय संघ कसोटीमध्येअग्रस्थानी विराजमान झाला होता पण स्थान टिकवण्यासाठी भारताला विजय आवश्यक होता. मालिकेतील भारताची कामगिरी पाहता भारतीय संघ स्थान टिकवेल यात शंका नव्हती. मालिकेतवेस्ट इंडिजच्या संघाला भारताला हरवणे शक्य झाले नाही पण अखेरच्या सामन्यात पावसाने मात्र भारताला हरवले आणि कसोटी क्रमवारी सुरु झाल्यापासुन पाकिस्तानचा संघ अग्रस्थानी विराजमान झाला.

भारताने मालिका २-० ने जरी जिंकली असेल तरी अग्रस्थान गमवावे लागल्याने कोहलीच्या मनाला लागले असणार यात शंका नाही. आशिया खंडाबाहेर कोहलीच्या नेतृत्त्वाखाली पहिला दौरा तसेच अनिल कुंबळेचा प्रशिक्षक म्हणुन पहिला दौरा यामुळे या मालिकेचे महत्त्व काही वेगळेच होते. भारताने मालिकेत निर्विदाद वर्चस्व राखले, चेतेश्वर पुजारा व शिखर धवन तितकेसे सफल झाले नाहीत पण अश्विन, कोहली, रहाणे, राहुल आणि साहा यांनी फलंदाजीचा मनमुराद आनंद लुटला.
पहिल्या कसोटीपासुन भारताने वर्चस्व राखत पहिली कसोटी एक डाव व ९२ धावांनी जिंकली अशाच कामगिरीची उर्वरीत सामन्यांत पुनरावृत्ती करेल अशी आशा होती त्याप्रमाणे दुसऱ्या कसोटीत मोठा विजय मिळवण्याच्या उंबरठ्यावर भारतीय संघ होता पण रोस्टन चेसची नाबाद शतकी खेळी आणि त्याला जेसन होल्डर, यष्टिरक्षक शेन डावरीच व ब्लॅकवुडने दिलेली साथ यांनी पुर्ण दिवसभर टिच्चुन फलंदाजी केली आणि भारताला विजयापासुन रोखले. तीसऱ्या कसोटीत खेळ वाया गेला होता भारतीय संघ ५ बाद १२६ अशा अडचणीत सापडला होता पण अश्विन व साहाने शतके ठोकत भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली. भारताला पहिल्या डावात १२८ धावांची महत्त्वपुर्ण भुमिका बजावली ती भुवनेश्वर कुमारने. दुसऱ्या डावात झटपट धावा करुन भारताने वेस्ट इंडिज पुढे शेवटच्या दिवशी ३४६ धावांचे अशक्यप्राय लक्ष्य ठेवले आणि गोलंदाजांच्या कामगिरीने वेस्ट इंडिजचा १०८ धावांत खुर्दा उडवला.
ज्याप्रकारे कोहलीने अश्विनच्या फलंदाजीवर विश्वास ठेऊन त्याला फलंदाजी क्रमवारीत बढती दिली ते आव्हान अश्विनने लिलया पेलले. अश्विने पुन्हा एकदा मालिकावीर पुरस्काराला गवसणी घातली. या मालिकेत त्याने १७ गडी बाद तर केलेच तसेच फलंदाजीत दोन शतकांसहीत २३५ धावा ठोकल्या अशी अष्टपैलु कामगिरी बजावली. आपल्या ३६ कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत अश्विनने तब्बल ६ वेळेस मालिकावीर पुरस्कार पटकवला आहे यात त्याने क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला सुद्धा मागे टाकले आहे. अशाच कामगिरीची पुनरावृत्ती येणाऱ्यामालिकांमध्ये भारतीय संघानी करावी हीच इच्छा.
शंतनु कुलकर्णी

No comments:

Post a Comment