Tuesday, 20 September 2016

२० सप्टेंबर २००७ भारत वि. दक्षिण आफ्रिका

भारताने साखळी सामन्यात पाकिस्तानविरुद्ध बॉल आऊटमध्ये विजय मिळवुन अंतिम ८ मध्ये प्रवेश मिळवला पण त्यातील पहिल्याच सामन्यात न्युझिलंडविरुद्ध भारताला १० धावांनी पराभव स्विकारावा लागला. १९१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गंभीर व सेहवागने ६ षटकांत ७६ धावांची सलामी देत धडाकेबाज सुरुवात करुन दिली परंतु त्यानंतर भारताची फलंदाजी व्हिटोरीच्या गोलंदाजी समोर ढोपाळली शेवटी श्रीसंतने थोडा प्रतिकार केला पण त्याला यश आले नाही. या सामन्यात झालेल्या पराभवाने उर्वरीत इंग्लंड व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विजय आवश्यक होता. न्युझिलंडविरुद्धच्या सामन्याप्रमाणेच या सामन्यात गंभीर व सेहवागच्या जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजीचा समाचार घेत १४.४ षटकांत १३६ धावांची सलामी भागीदारी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. त्यानंतर १० धावांच्या आत दोघेही तंबुत परतले.१६.४ षटकांत भारताची ३ बाद १५५ अशी स्थिती झाली त्यानंतर मैदानावर आलेल्या युवराजने स्टुअर्ट ब्रॉडची पिसे काढली. भारतीय डावाच्या १९ व्या षटकांत युवराजने स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर सहा चेंडूत सहा षटकार खेचले आणि विक्रमी १२ चेंडुत अर्धशतक साजरे केले आणि भारताने १८ धावांनी विजय मिळवला.
      भारत व दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यापुर्वी न्युझिलंड व दक्षिण आफ्रिकेनी प्रत्येकी दोन विजय मिळवले होते त्यामुळे उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताला विजय आवश्यक होता परंतु दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात धडाकेबाज खेळी करणारा युवराज सिंग या सामन्याला मुकणार होता त्यामुळे सामन्यापुर्वीच भारतीय संघ अडचणीत आला होता. नाणेफेक जिंकुन भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला पण पहिल्या ११ षटकांत हा निर्णय भारताच्याच अंगाशी आला असे दिसत होता. १०.३ षटकांत भारताची अवस्था ४ बाद ६१ झाली होती त्यानंतर नवोदित फलंदाज रोहित शर्मा व कर्णधार धोनीने भारताला १५० धावांचा टप्पा गाठुन दिला व डावाच्या शेवटच्या चेंडूवर रोहितने षटकार ठोकुन पहिले अर्धशतक साजरे केले.
      तसे पाहता दक्षिण आफ्रिकेसारख्या तगड्या संघासमोर १५४ धावांचे आव्हान तसे कमीच होते कारण विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनी २०६ धावांचे आव्हान ८ गडी व १४ चेंडू राखुन लिलया पार केले होते. या सामन्यांत भारतीय गोलंदाजांचा कस लागणार होता. आर पी सिंगने भारताला दमदार सुरुवात करुन देत दुसऱ्या षटकांत हर्षेल गिब्स व ग्रॅमी स्मिथला बाद केले त्यातील ग्रॅमी स्मिथला बाद कारण्याचे श्रेय हे पुर्णपणे दिनेश कार्तिकचे होते. स्लिपमध्ये उत्कृष्ट झेल घेऊन स्मिथला तंबुत पाठवले. त्यानंतरच्याच षटकांत श्रीसंतने डिव्हिलीअर्सला पायचित केले. ६ व्या षटकांत रोहित शर्माच्या थेट फेकीवर जस्टिन केम्पला बाद केले व त्यानंतरच्याच चेंडूवर आर पी सिंगने पोलॉकला त्रिफळाचीत करुन दक्षिण आफ्रिकेची ५ बाद ३१ अशी अवस्था केली.
      त्यानंतर बाऊचर व मॉर्केलने प्रतिकार केला पण त्यांना यश आले नाही आणि भारताने ३७ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली व त्यानंतर विजेतेपदाला गवसणी घातली. दक्षिण आफ्रिकेला उपांत्य फेरीत धडकमारण्यासाठी विजय किंवा किमान १२६ धावा करणे आवश्यक होते पण दोन्हीत त्यांना अपयश आले आणि ते स्पर्धेबाहेर गेले त्यांच्या जागी न्यझिलंडचा संघ उपांत्य फेरीत दाखल झाला.
शंतनु कुलकर्णी

Thursday, 25 August 2016

भारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी चेंडूच्या पर्वाची सुरुवात

सुरुवातीला लाल चेंडू नंतर पांढरा चेंडू आणि आता गुलाबी चेंडू. सर्वोत्तम क्रिकेट म्हटले की कसोटी क्रिकेटच अग्रस्थानी राहणार परंतु सध्याच्या वाढत्या टि-२० व एकदिवसीय सामन्यांमुळे नवोदित खेळाडुंचे कसोटी क्रिकेटकडे दुर्लक्ष होते. खेळाडंचा गैरसमज होतो की जेव्हा एखादा खेळाडू टि-२० व मर्यादित षटकांच्या सामन्यात यशस्वी ठरला की तो यशस्वी खेळाडू म्हणून गणला जाईल. परंतु इतिहास पाहिला तर ज्याप्रकारे सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, कुमार संगकारा, माहेला जयवर्धने, जॅक कॅलिस कसोटी क्रिकेट व एकदिवसीय क्रिकेटमध्ये यशस्वी झाले तितकेच ते टि-२० मध्ये यशस्वी झाले.आजच्या घडीला जर व्हिव रीचर्डस, कपिल देव, इम्रान खान, वासीम अक्रम खेळत असते तर त्यांनी टि-२० मध्ये आपला दबदबा निर्माण केला असता यात शंका नाही.
कसोटी क्रिकेट म्हणजे सभ्य माणसांचा खेळ ते पांढऱ्या पोशाखाने दिसुनच येते. जसा बदल प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचा असतो त्याच प्रकारे काळानुसार क्रिकेटमध्ये अनेक बदल घडुन आले जसे फ्रि हीट, धावक फलंदाजाच्या छाती व डोक्यावरुन उसळी घेत जाणाऱ्या चेंडूची संख्या, तीसरे पंच. एकदिवसीय क्रिकेटमध्ये लाल चेडू ऐवजी पांढरा चेंडू वापरला जाऊ लागला आणि पांढऱ्या शुभ्र कपड्यांची जागा रंगीत कपड्यांनी घेतली. आधी ६० षटकांचा खेळला जाणारा एकदिवसीय सामना आता ५० षटकांचा खेळला जातो.
प्रेक्षकांना कसोटी क्रिकेटकडे आकर्षित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एकदिवसीय सामन्यांप्रमाणेच कसोटी सामने दिवस रात्र खेळवण्यास सुरुवात झाली ती ऑस्ट्रेलिया-न्युझिलंड सामन्याने. गुलाबी चेडूचा वापर सुरु झाला आणि क्रिकेटमध्ये एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. त्याच धर्तीवर बीसीसीआयने २०१६ ची दुलिप ट्रॉफी गुलाबी चेंडुच्या सहाय्याने दिवस रात्र खेळवण्यास सुरुवात झाली. या आधी प.बंगाल मध्ये क्लब क्रिकेटमध्ये एका सामन्यात गुलाबी चेंडूचा वापर करण्यात आला पण पहिल्यांदाच संपुर्ण स्पर्धेत गुलाबी चेंडू वापरला जाणार आहे यामुळे फलंदाजा बरोबरच गोलंदाजाला समान संधी मिळणार आहे. निश्चितच याचा फायदा कसोटी क्रिकेटबद्दल आकर्षण निर्माण करण्यासाठी तसेच कसोटी क्रिकेटचे स्थान टिकवण्यात होईल.

शंतनु कुलकर्णी

Tuesday, 23 August 2016

मालिका २-० ने जिंकुन भारताची दुसऱ्या स्थानावर घसरण तर पाकिस्तान कसोटी मध्ये अग्रस्थानी विराजमान

एक छोटी गोष्ट काय बदल घडवु शकते हे काल संपलेल्या भारत-वेस्ट इंडिजच्या मालिकेत दिसुन आले. अखेरच्या सामन्यात खेळ झाला फक्त २२ षटकांचा आणि सलग चार दिवस एकही चेडू टाकला गेला नाही, सामना अनिर्णित राहिला. चौथ्या सामन्यापुर्वी, श्रीलंकेनी ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ३-० ने जिंकली तसेच पाकिस्तानने इंग्लंडला २-२ असे रोखले आणि भारतीय संघ कसोटीमध्येअग्रस्थानी विराजमान झाला होता पण स्थान टिकवण्यासाठी भारताला विजय आवश्यक होता. मालिकेतील भारताची कामगिरी पाहता भारतीय संघ स्थान टिकवेल यात शंका नव्हती. मालिकेतवेस्ट इंडिजच्या संघाला भारताला हरवणे शक्य झाले नाही पण अखेरच्या सामन्यात पावसाने मात्र भारताला हरवले आणि कसोटी क्रमवारी सुरु झाल्यापासुन पाकिस्तानचा संघ अग्रस्थानी विराजमान झाला.

भारताने मालिका २-० ने जरी जिंकली असेल तरी अग्रस्थान गमवावे लागल्याने कोहलीच्या मनाला लागले असणार यात शंका नाही. आशिया खंडाबाहेर कोहलीच्या नेतृत्त्वाखाली पहिला दौरा तसेच अनिल कुंबळेचा प्रशिक्षक म्हणुन पहिला दौरा यामुळे या मालिकेचे महत्त्व काही वेगळेच होते. भारताने मालिकेत निर्विदाद वर्चस्व राखले, चेतेश्वर पुजारा व शिखर धवन तितकेसे सफल झाले नाहीत पण अश्विन, कोहली, रहाणे, राहुल आणि साहा यांनी फलंदाजीचा मनमुराद आनंद लुटला.
पहिल्या कसोटीपासुन भारताने वर्चस्व राखत पहिली कसोटी एक डाव व ९२ धावांनी जिंकली अशाच कामगिरीची उर्वरीत सामन्यांत पुनरावृत्ती करेल अशी आशा होती त्याप्रमाणे दुसऱ्या कसोटीत मोठा विजय मिळवण्याच्या उंबरठ्यावर भारतीय संघ होता पण रोस्टन चेसची नाबाद शतकी खेळी आणि त्याला जेसन होल्डर, यष्टिरक्षक शेन डावरीच व ब्लॅकवुडने दिलेली साथ यांनी पुर्ण दिवसभर टिच्चुन फलंदाजी केली आणि भारताला विजयापासुन रोखले. तीसऱ्या कसोटीत खेळ वाया गेला होता भारतीय संघ ५ बाद १२६ अशा अडचणीत सापडला होता पण अश्विन व साहाने शतके ठोकत भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली. भारताला पहिल्या डावात १२८ धावांची महत्त्वपुर्ण भुमिका बजावली ती भुवनेश्वर कुमारने. दुसऱ्या डावात झटपट धावा करुन भारताने वेस्ट इंडिज पुढे शेवटच्या दिवशी ३४६ धावांचे अशक्यप्राय लक्ष्य ठेवले आणि गोलंदाजांच्या कामगिरीने वेस्ट इंडिजचा १०८ धावांत खुर्दा उडवला.
ज्याप्रकारे कोहलीने अश्विनच्या फलंदाजीवर विश्वास ठेऊन त्याला फलंदाजी क्रमवारीत बढती दिली ते आव्हान अश्विनने लिलया पेलले. अश्विने पुन्हा एकदा मालिकावीर पुरस्काराला गवसणी घातली. या मालिकेत त्याने १७ गडी बाद तर केलेच तसेच फलंदाजीत दोन शतकांसहीत २३५ धावा ठोकल्या अशी अष्टपैलु कामगिरी बजावली. आपल्या ३६ कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत अश्विनने तब्बल ६ वेळेस मालिकावीर पुरस्कार पटकवला आहे यात त्याने क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला सुद्धा मागे टाकले आहे. अशाच कामगिरीची पुनरावृत्ती येणाऱ्यामालिकांमध्ये भारतीय संघानी करावी हीच इच्छा.
शंतनु कुलकर्णी